फुलचंद भगत
वाशिम:-तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये करण्यात आलेल्या चिखली फाटा ते सतीआई बाजार रोडच्या कामावरून गंभीर अनियमितता समोर आल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या संदर्भात युवासेना उपतालुका प्रमुख पांडुरंग पुंडलिक राऊत यांनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग, मंगरुळपीर यांना निवेदन सादर करून कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


निवेदनात नमूद आहे की, वर्षही झाले नसताना रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत. तसेच कामामध्ये वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असून बीबीएम (BBM) काम योग्य पद्धतीने न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढा मोठा निधी खर्च करूनही कामाची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याने यात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. युवासेनेच्या वतीने ठेकेदार आणि संबंधित विभागातील अभियंता यांच्यात संगनमत झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास युवासेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग, मंगरुळपीर जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.याप्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *