गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील श्रद्धावान बौद्ध उपासक व उपासिका यांनी पवित्र बुद्धभूमी व जागतिक तीर्थक्षेत्र महाबोधी मंदिर येथे जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेत धम्माची प्रेरणा आत्मसात केली. बुद्धभूमीचे दर्शन घेऊन वरखेड येथे परतल्यानंतर संपूर्ण गावात उत्साह, आनंद आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
जयभीम… नमो बुद्धाय…च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. गावकऱ्यांनी पुष्पहार घालून, फटाक्यांची आतषबाजी करत श्रद्धावान उपासकांचे भव्य स्वागत केले. यावेळी भीमसैनिक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुद्धभूमीचे दर्शन करून परतलेल्या उपासकांनी भगवान बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा संदेश समाजात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. “भगवान बुद्धांचे विचार हेच मानवतेचे खरे मार्गदर्शक आहेत,” असा संदेश देत ग्रामस्थांनी बौद्ध धम्माप्रती आपली अढळ निष्ठा व्यक्त केली.

तसेच बौद्धगया येथून परतलेल्या श्रद्धावान उपासकांच्या वतीने येत्या रविवारी वरखेड येथे भव्य दिव्य खीरदान कार्यक्रम तसेच भगवान बुद्धांच्या गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भीमसैनिक, उपासक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वरखेड गावात झालेला हा स्वागत सोहळा गावासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरला असून, धम्म जागृतीची नवी ऊर्जा निर्माण करणारा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे
