वाशिम:-जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. या गंभीर परिस्थितीचा गैरफायदा घेत इंधनाची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध वाशिम प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाशिम तालुक्यातील तोंडगाव नाका फाटा परिसरात असलेल्या एका धाब्यावर महसूल विभागाने धडक कारवाई करत, तब्बल २०० लिटर अवैध डिझेल साठा जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, उपविभागीय अधिकारी (SDO) वैशाली देवकर आणि तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या विशेष पथकाने धाब्यावर अचानक छापा टाकला. सुनील धाडवे यांच्या मालकीच्या या धाब्यावर इंधनाची अवैध विक्री आणि साठेबाजी सुरू असल्याचे आढळून आले. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे इंधन माफियांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईत जप्त करण्यात आलेला २०० लिटर डिझेलचा साठा पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. संशयित धाबा चालकावर नियमांनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इंधनाच्या टंचाईचा काळ पाहून अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर प्रशासन अत्यंत कठोर आहे. “अशा प्रकारच्या समाजकंटकांमुळे सामान्य जनतेची गैरसोय होत आहे, त्यामुळे यापुढेही ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल,” असा इशारा प्रशासकीय सूत्रांनी दिला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
