जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका आणि साहित्यिक शिक्षिका मीना अशोक म्हसे-आसने यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधत पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मीना अशोक म्हसे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवत आहेत. यामध्ये काव्यनिर्मिती, दिंडी, दहीहंडी उत्सव, गणेशमूर्ती बनवणे, परिसरातील उल्लेखनीय व्यक्तीची मुलाखत, औषधी वनस्पतींची लागवड तसेच परिसरातील सापांची माहिती अशा उपक्रमांचा समावेश आहे.
याशिवाय मंथन, शिष्यवृत्ती अशा स्पर्धा परीक्षांची तयारीही त्या शाळेत करून घेतात. त्यांच्या या उपक्रमांची दखल घेत जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मीना म्हसे यांना मिळालेल्या या जिल्हास्तरीय पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
