पऱ्हाडवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मनिषा विश्वास साकोरे यांना यंदाचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पऱ्हाडवाडी येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मनिषा विश्वास साकोरे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. यामध्ये काव्यनिर्मिती, दिंडी, दहीहंडी उत्सव आणि गणेशमूर्ती बनवणे यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच मंथन, शिष्यवृत्ती अशा स्पर्धा परीक्षांची तयारीही त्या शाळेत घेतात.
त्यांच्या या उपक्रमांची दखल घेत जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबद्दल शिक्षण क्षेत्रातून मनिषा साकोरे यांचे अभिनंदन होत आहे.
