गडचिरोली : मागील सात दिवसांपासून घरातून गायब असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन युवतीचा मृतदेह शेत परिसरात पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना भामरागड तालुक्यातील गेर्रा येथे उघडकीस आली आहे. मिना येरा सिडाम रा. मन्नेराजाराम ता. भामरागड असे मृतवस्थेत आढळून आलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. या घटनेने भामरागडसह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.


प्राप्त माहितीनुसार मागील आठवड्यातील मंगळवारी मिना आपल्या घरातून अचानक निघून गेली होती. ती परत न आल्याने कुटूंबियासह नातेवाईकांनी शोध मोहिम राबविली. मात्र मिनाचा थांगपत्ता लागला नाही. मात्र यासंदर्भात कुटूबियांनी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रारच दिली नसल्याची माहिती आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सोमवारी गेर्रा गावाजवळ असलेल्या शेत परिसरात मिनाचे शव जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती प्राप्त होताच तत्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास जिमलगट्टा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात सुरु आहे.

302 अन्वये गुन्हा दाखल
दोन दिवसांपूर्वी गेर्रा गावाजवळील शेत शिवारात अल्पवयीन युवतीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढण्यात आले. पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहे. अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झालेला नाही. या घटनेसंदर्भात 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस गांभीर्याने करीत आहेत.”-क्षिरसागर, पोलिस अधिकारी, जिमलगट्टा उपविभाग

माजी सरपंचाला घेतले ताब्यात

अल्पवयीन युवतीची हत्या करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरल्याप्रकरणी पोलिसांनी मन्नेराजाराम येथील माजी सरपंच रंगा मडावी याला चौकशीसाठी मंगळवारला ताब्यात घेतले आहे. रंगा मडावी यांचा मुलगा अविनाश रंगा मडावी हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अविनाशच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची चर्चा?

मृतक अल्पवयीन युवतीचे अविनाश नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध सुरु होते. त्यामुळेच ती घरातून निघून गेली. काही दिवस लोटूनही ती घरी परत आली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्या अल्पवयीन युवतीचा मृतदेह गेर्रा गावातील शेतशिवारात जमिनीत पुरलेल्या स्थितीत आढळून आला. तिची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा भामरागड तालुक्यात सुरु आहे. पोलिसांनीही प्रेम प्रकरणाला दुजोरा दिला असून हत्येचे नेमके कारण कोणते, हत्या कोणी केली, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *