पालघर : ( प्रविण बाबरे ) — तारापूर एमआयडीसीमधील विराज स्टील आणि विराज प्रोफाईल या कंपनीत लोखंडावर प्रक्रीया करताना निर्माण झालेली राख (फ्लाय एश) ही बोईसर पूर्वेकडील नागरी वस्ती असलेल्या बेटेगाव च्या हद्दीतील २५ एकर जागेवर घेतलेल्या परवानगी मधील अटी व शर्तिचा भंग करून मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवण्यात आली असून हे स्लग मानवी आरोग्यास घातक असून अशा या प्रदूषित राखेचे मोठमोठे डोंगर या ठिकाणी तयार झाले आहेत.या राखेच्या डोंगराला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत असल्याने त्यातून तयार होणार्या घातक धूराने सभोवतालच्या बेटेगाव,मान,वारांगडे गावातील नागरीकांचा श्वास गुदमरू लागला आहे.

तारापूर एमआयडीसीमध्ये विराज प्रोफाईल ही स्टील उत्पादक कंपनी असून या कंपनीच्या तारापूर आणि वारांगडे येथील प्लांटमध्ये लोखंडावर प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषीत राख बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व्हे क्र.१५८/१/६४ मधील २५ एकर जागेमध्ये साठवणूक करण्यात येत असून या ठिकाणी राखेचे भलेमोठे डोंगर तयार झाले आहेत.या प्रदूषीत राखेच्या ढीगार्यांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. प्रदूषित राखेच्या साठ्याला लागणाऱ्या आगीमुळे परीसरात प्रचंड धूर निर्माण होऊन त्याचा सभोवतालच्या बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग,ओत्सवाल वंडरसिटी,रूपरजत पार्क या गृहनिर्माण सोसायटयासह नवापाडा,मान आणि वारांगडे येथील आदीवासी पाडयातील नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

आदीवासी पाड्याजवळ करण्यात येणार्या या प्रदूषीत राखेच्या साठवणुकीसाठी कंपनीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कडून घेतलेल्या परवानगीच्या अटी व शर्तीचा भंग करत आहेत.तसेच संबंधित बेटेगाव ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नसल्याचा आरोप स्थानिक गावकर्यांनी केला आहे.या जागेच्या बाजूलाच स्थानिकांच्या शेतजमिनी असून पावसाळ्यात हे राखेचे प्रदूषीत पाणी ओढे-नाले यांच्यावाटे परीसरातील जमिनी, विहीरी-कूपनलिका यांच्यामध्ये झिरपून शेतजमिनीसोबतच पिण्याचे पाण्याचे स्त्रोत देखील दुषीत होत आहेत.तसेच राख वार्यासोबत आकाशात उडून त्याचे थर पुन्हा परीसरातील घरांवर तसेच शेत पिकांवर येऊन बसत असल्याने अनेकांना श्वसनाचे तसेच अस्थमाचे आजार बळावत आहेत. विराज कंपनीकडून बेकायदेशीरपणे होत असलेल्या प्रदूषीत राखेच्या या साठवणुकीविरोधात बेटेगाव,मान आणि वारांगडे येथील गावकर्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.परंतु त्यांची प्रदूषीत राखेच्या फेर्यातून अजूनही सुटका झालेली नाही.
[ या बाबत विराज कंपनी प्रशासनाशी मोबाईल वरुन संपर्क करून प्रतिक्रिया मागवली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.]
अवैधरित्या टाकण्यात आलेल्या राखेवर (स्लग) राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तारापूर कारवाई करत नाही.
अजीत संखे
लेबर हेल्फ फाउंडेशन
अध्यक्ष
विराज कंपनी टाकत असलेल्या राखे (स्लग) बाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कार्यालय तारापूर येते वेळोवेळी कार्रवाई साठी तक्रार करण्यात आल्या आहेत तसेच ग्रामपंचायत कार्यालय काढून सदरच्या जागेवर राख(स्लग)टाकण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.
विद्या पिंपळे
ग्रामविकास अधिकारी
बेटेगाव ग्रामपंचायत
संबंधित टाकण्यात आलेल्या राखेची (स्लग)ची पाहणी करून जर यामध्ये नियम व अटी चे पालन होत नसल्यास पुढील कारवाईसाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येईल.
दिपक बनसोडे
म.प्र.मंडळ
उपप्रादेशिक.अ.ता.कार्यालय 2