जिल्ह्यातील शेतकर्यांची दिवाळी अंधारात…
गोंदिया : दिवाळीचा सण सुरू असला तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात पावसाने व्यत्यय आणला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतात पीक आहे, पण पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेतीमाल आहे, पण खिशात पैसा नाही, अशा अवस्थेत दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले भात पीक मॉन्सूनत्तोर पावसामुळे अडचणीत आली आहेत. त्यामुळे शेतीमाल काढणीस येऊनही पावसामुळे तो मातीमोल झाला आहे. त्यामुळे दोन पैसे सुद्धा शेतकऱ्याला साधता आले नाही. सतत दोन वर्षे कोरोना व आता निसर्गाचा मारा मग आर्थिक अडचणीत दिवाळी सण साजरा करावा तरी कसा, या विवंचनेने शेतकरी त्रस्त आहेत. जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकऱ्यांनी नियोजन करून हंगामी भात पीक बहरवले. त्यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे, पुढील पेरणीचे नियोजन ठरले.

मात्र या वर्षी परतिच्या पावसाने जोरदार फटका दिला. मुसळधार पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीमालाच्या विक्रीवर दिवाळीत मुलामुलींच्या कपड्यालत्त्यासह फराळ, फटाके खरेदीचे नियोजन असतो. मात्र यंदा शेतकऱ्यांचे स्वप्न पावसात वाहून गेले आहे.
प्रतिक्रिया
चालू वर्षी धानाची लागवट केली. सावकारा कडुन कर्ज काढुन मोठा खर्च करून हंगाम घेतला. मात्र परतिच्या पावसाने कापनिस आलेल्या भात पीकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे दिवाळी कडू झाली आहे. – यादोराव तांडेकर (शेतकरी)