आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील तीन वस्त्यांवर गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. पाण्यासोबतच घरगुती वीजपुरवठाही बंद असल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, आता प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील मौजे शिरापूर येथील जिवे वस्ती, उकांडे वस्ती आणि गिलचे वस्ती या तीन वस्त्यांवरील ग्रामस्थांना गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी आणि घरगुती वीजपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, लहान मुले आणि वृद्धांची मोठी परवड होत आहे.

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन दिले आहे. सार्वजनिक विहिरीवरील वीज जोडणी तातडीने सुरू करावी किंवा पर्याय म्हणून तेथे सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शेजारील पिंपळगाव मेहेकरी आणि पुंडी या गावांमध्ये पाणी व वीजपुरवठा सुरळीत असताना शिरापूरच्या तीन वस्त्यांवरच हे संकट का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

प्रशासनाने तातडीने पाणी आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शिरापूर-मेहकरी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन आणि हंडा मोर्चा काढण्यात येईल. तसेच टँकरची वाहतूक रोखण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी २० ते २५ दिवस संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. तहसील प्रशासन आणि संबंधित वीज वितरण विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. या निवेदनावर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच संबंधित वस्त्यांवरील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *