लातूरमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील फरार तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पळशी फाटा येथे ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून दोन धारदार हत्यारे आणि टोयोटा फॉर्च्युनर वाहन असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे दाखल गुन्हा रजि. नं. ४४७/२०२६, कलम १०३(१), १०९(१), ३(५) भारतीय न्याय संहितेतील फरार आरोपींचा शोध सुरू होता. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्ही. माने यांच्या पथकाने कारवाई केली.

गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तीन आरोपी पळशी फाटा येथे फॉर्च्युनर वाहनासह थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून अल्ताफखान सरदारखान पठाण (वय ४१), उमर मेहबूब शेख (वय २४) आणि खालेद हमीद शेख (वय ३९) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पांढऱ्या रंगाच्या टोयोटा फॉर्च्युनर क्रमांक MH 44 T 0221 ची झडती घेतली असता एक कोयत्यासदृश धारदार हत्यार आणि एक फोल्डिंग चाकू मिळून आला. दोन्ही हत्यारे व वाहन जप्त करण्यात आले असून तिन्ही आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे, लातूर येथे हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिल्लापटे, तुराब पठाण, गोविंद येलमटे, पाराजी पुठेवाड आणि तुळशीराम बरुरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *