वाशिम : पत्रकारीतेचे चालतेबोलते विद्यापीठ, संवेदनशिल व विद्रोही लेखक, विचारवंत, कलावंत, कुशल संघटक, समाजसेवक, मार्गदर्शक अशी कितीही विशेषणे त्यांच्या नावापुढे लावली तरी त्यांच्या कर्तृत्वाची उंची मोजता येणार नाही. आज अचानक मंगलदादांच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांना मोठा धक्का बसला. लहानमोठ्या सर्वांशी अत्यंत अदबीने व नम्रतेने वागणारे मंगलदादा पत्रकारीतेचे चालतेबोलते विद्यापीठच होते. फाडफाड इंग्रजी बोलणारे मंगलदादा जेव्हा मंत्र्यांसमोर बोलायचे तेव्हा मंत्र्यांना सुध्दा घाम फुटायचा असे त्यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व होते. खर्या अथार्र्ने ते वाशिम जिल्हयाच्या पत्रकारीतेचे भूषण होते.

लहानपणापासुनच बहुजन विचारसरणीचे असणार्या मंगलदादांची लेखणी बहूजन, शोषित आणि पिडीतांच्या भल्यासाठी जीवनभर झटली. लेखणीशी त्यांनी निष्ठेने इमान राखत कधीही गद्दारी केली नाही. अनेकांना त्यांनी लहानाचे मोठे केले. अनेकांचा हात धरुन पत्रकारीता शिकविली. अनेकांना श्रीमंत केले. अनेक पत्रकार, विचारवंत, लेखक घडविले. मात्र श्रीमंत मनाच्या या राजाची झोळी नेहमी रिकामीच राहीली. मंगलदादांबद्दल वाशिम जिल्हयातील सर्व लहानमोठ्या पत्रकारांना नेहमी आदर होता आणि निरंतर राहील. न्यायाची चाड आणि अन्यायाची चिड त्यांच्या सडेतोड आणि निष्पक्ष लेखणीतून नेहमी दिसत राहीली. आपल्या कठोर आणि वेगळ्या धाटणीच्या लेखणीतून त्यांनी अनेक भ्रष्टाचार्यांना सत्तेच्या खुर्चीवरुन खाली खेचले. अनेकांच्या पदाचा माज उतरविला. अनेकांना तुरुंगात पोहचविले. त्यांचे नाव घेतले की भल्याभल्या भ्रष्टाचार्यांना घाम फुटायचा असेच त्यांचे व्यक्तीमत्व होते. अनेक आमिषे आली, मात्र पैशासाठी त्यांनी कधीही आपला स्वाभिमान, आपली लेखणी विकली नाही, गहाण ठेवली नाही. समोर नगरसेवक, आमदार, मंत्री असो दादांनी कधीही भिडभाड ठेवली नाही. दादा पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यासाठी उभे राहीले की भल्याभल्यांची गाळण उडत असे. लहान पत्रकारांसाठी दादा मार्गदर्शक होते तर मोठे पत्रकार दादांना गुरुस्थानी मानायचे. दादांना जाणणार्यांची, मानणार्यांची संख्या शेकडोंच्या, हजारोंच्या नाही तर लाखोंच्या घरात आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यत असा एकही पत्रकार नाही की जो दादांना ओळखत नाही.
एखादे प्रकरण हाती घेतले की पिडीतांना न्याय मिळेपर्यत ते स्वस्थ बसायचे नाही. आपल्या समर्थ आणि बाणेदार लेखणीतून त्यांनी धसास लावलेली अनेक प्रकरणे महाराष्ट्रभर गाजली आहेत. बहूजन हिताच्या विविध संघटनांमध्ये त्यांनी झोकून काम केले आहे. भ्रष्ट सत्ताधार्याविरुध्द ते पोटतिडकीने बोलत होते. त्यांच्या छत्रछायेत व त्यांचा हात धरुन अनेक नव्या दमाचे पत्रकार तयार झाले. अनेक समाजसेवक त्यांनी घडविले. आपला परिवार, आपला समाज व आपल्या देशाप्रती कधीही गद्दारी करु नका असे ते नेहमी सांगत. चौफेर व अथांग ज्ञान, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कोणताही विषय, कोणतेही क्षेत्र दादांच्या बुध्दीपुढे टिकले नाही. दादांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा पाऊस पाडला. त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी त्यांना मानणारे तासनतास त्यांच्याजवळ बसून राहत. दादा म्हणजे अथांग माहिती व ज्ञानाचे महासागर होते. अनेक मोठ्या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारीता केली. मात्र त्या पत्रकारीतेचा त्यांनी कधीही गर्व केला नाही.
दादांच्या लेखणीमुळे अनेकजण मोठे झाले. मात्र दादांनी कधीही अपेक्षा ठेवली नाही. ते निस्वार्थपणे पत्रकारीतेशी इमान राखून लिहीत राहीले. अनेक वृत्तपत्रे त्यांच्या लेखणीमुळे पुढे गेली. मात्र दादा होते तिथेच राहीले. त्यांना लोकांनी कधीही स्वत:च्या दुचाकी वा चारचाकीमध्ये बसलेले बघीतले नाही. दादांच्या लेखणीरुपी शब्दांवर स्वार होवून अनेकजण श्रीमंत झाले. मात्र दादा स्वाभिमानाने चालत राहीले. पत्रकारीता वा समाजसेवा करत असतांना दादांनी कधीही पुरस्काराची किंवा कौतुकाची अपेक्षा ठेवली नाही.
कोरोनाकाळामध्ये डॉक्टर्सकडून होणार्या कोरोना रुग्णांच्या अव्वाच्या सव्वा लुटीचे प्रकरण त्यांनी प्रशासनापुढे लावून धरले. व रुग्णांना न्यााय मिळेपर्यत ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांच्या एकाच बातमीच्या प्रभावामुळे मोठमोठे पोलीस अधिकारी, महसुल अधिकार्यांच्या बदल्या झालेल्या पत्रकारांनी बघीतल्या आहेत. त्यांच्या माहितीचा सोर्स प्रचंड होता. दांडग्या स्मरणशक्तीमुळे संदर्भासहीत बातमीची कला अवगत असलेले ते एकमेव पत्रकार होते असे म्हटल्यास चुक ठरु नये. शोध पत्रकारीतेचे ते धनी होते.
वाशिम येथील कामगारांची वस्ती असलेल्या आंबेडकर नगरमधील अवैध देशीदारु व कुंटनखाना हटविण्यासाठी वंचितांचे समर्थ नेतृत्व करुन हा प्रश्न मार्गी लावला. अनेक लहान मोठ्या पत्रकार संघटनांमध्ये ते मार्गदर्शक म्हणून लाभले. पिडीत व अन्याय झालेल्या पत्रकारांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहीले. स्वत:च्या मनात त्यांनी कोणत्याही पत्रकार वा व्यक्तींबद्दल आकस ठेवला नाही. अनेक व्यासपिठे, विचारमंच त्यांनी आपल्या दमदार आवाजाने गाजविले. अनेक कार्यक्रमांत त्यांनी पदे भुषविली. मंगलदादा इंगोले हे वाशिम जिल्हयातील पत्रकारीतेच्या इतिहासातील एक सुवर्णपान होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जिल्हयाच्या पत्रकारीतेतील भुतकाळ, वर्तमानकाळ त्यांच्या समर्थ लेखणीने गाजला. पारंपारीक पत्रकारीतेला मुठमाती देवून त्यांनी नव्या विद्रोही पत्रकारीतेला जन्म दिला. त्यांनी लिहीलेली बातमी थेट काळजाला भिडणारी व भ्रष्टाचार्यांना धडकी बसविणारी अशीच होती. सत्यासाठी कोणतीही भिडभाड न लिहीता ते लिहत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांच्याविरुध्द अनेकदा कारवाईचा आसुड उगारला. मात्र पत्रकारीतेसोबत संविधानाचे, कायद्याचे प्रचंड ज्ञान असलेल्या मंगलदादांनी पोलीसांचीही बोलती बंद केली होती. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह बहूजनांच्या महापुरुषांबद्दल ते भरभरुन बोलत, भरभरुन लिहत. या महापुरुषांचे विचारच त्यांच्या लेखणीतून प्रसवले जात. पत्रकार प्रा. नंदलाल पवार, फुलचंद भगत यांच्यावर तहसिलदारांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याविरुध्द दादांनी बंड पुकारुन आक्रमक भूमिका घेतली होती. विद्रोही भूमिका घेवून आपल्या कठोर पत्रकारीतेतून सर्वसामान्यांना न्याय देणारे दादा आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच असह्य करणारी आहे. दादांनी जिल्हयातील सर्व पत्रकारांवर पितृवत माया केली. खर्या अर्थाने दादा पत्रकारीतेतील चालतेबोलते विद्यापीठच होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारीतेचा आधार गेला. त्यांच्या अकाली जाण्याने वाशिम जिल्हयातील पत्रकारीता खर्या अर्थाने पोरकी झाली.पत्रकारीतेतील त्यांचे अमुल्य योगदान विसल्या जाणार नाही. जिवनभर अन्यायाचा प्रतिकार करणार्या जेष्ठ पत्रकार मंगलदादा इंगोले यांना वाशिम जिल्हयातील समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली !