बुलढाणा : मायेची ममता काय असते ते आपल्या सर्वांना माहितचं आहे-कितीही मोठं संकट आलं तरी जीवाची पर्वा न करता आई आपल्या बाळाला कुशीत सामावते… परंतु जी माता आपल्या बाळाला मृत्यूच्या वाटेवर सोडून पसार होत असेल, तिला काय म्हणावे ? मायेची ममता काय असते कदाचित तिला हे माहीतच नसाव,अशा निर्दय मायने आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या वाटेवर सोडल्याने मायेच्या ममतेला काळीमा फासला गेला आहे, कदाचित अनैतिक संबंधाच्या विकृतीची काळी किनार या घटनेला असावी…अर्थात देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय मात्र याठिकाणीही आला… रामपहाऱ्यातच अंधारात उघड्यावर आणि जंगली श्वापदांच्या सावटाखाली असूनही पुरुष जातीचे हे बाळ वाचले… काळीज हेलावणारी ही घटना मलकापूरमध्ये उघडकीस आली.
बुलडाणा रोडवरील धारीवाल-छोरीया ईंटर नॅशनल स्कुल आवारातील नालीच्या चेम्बर मध्ये हे नवजात बाळ सोडून देण्यात आले होते. सकाळी सहा वाजेदरम्यान शेतात काम करत असतांना सुरेश नामदेव उमाळे रा.पंचमुखी नगर मलकापुर यांना लहान बाळ रडण्याचा आवाज ऐकु आल्याने घटनास्थळी जाऊन बघितले असता ते बाळ जिवंत असल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या अमरसिंह राजपूत यांना बोलावून ते दाखविले , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांना राजपूत यांनी घटनेची माहिती दिली, ठोसर यांनी शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांना भ्रमणध्वनी कळविले, पत्रकार गजानन ठोसर, नारायण पानसरे,श्रावण पानसरे,गणेश तायडे, विजय वर्मा, दिपक ईटनारे,ज्येष्ठ पत्रकार हनुमान जगताप, पो.हे.काॅ आनंद माने,पो.हे.काॅ संतोष कोल्हे,पो.काॅ.उमेश वाघ,पो.काॅ.राहुल वाघ,पो.काॅ.ईश्वर वाघ घटनास्थळी दाखल झाले,चेम्बर मध्ये टाकलेल्या बालकाला मु़ंग्या माकोड्यांनी चावा घेतल्याने बालक रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते तर त्याची नाळ गळ्याभोवती गुंडाळलेल्या स्थितीत होती.
पत्रकार गणेश तायडे यांनी नवजात बालकाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डाॅ.खोकले मॅडम् व त्यांच्या चमूने उपचार करुन गळ्याभोवती ची नाळ काढून कापून टाकत “त्या ” बालकाला पुढील उपचारार्थ पो.काॅ.राहुल वाघ यांचे समवेत 102 ॲम्ब्युलन्स द्वारे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशुविहार कक्षात ते बाळ सुखरूप पोहोचले असून त्याचेवर उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती पो.काॅ.राहुल वाघ यांनी दिली. सुरेश ज्ञानदेव उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 317अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ठाकरे करीत करीत आहे.