section and everything up until
* * @package Newsup */?> पुरप्रवण गावांचा सूक्ष्म आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी | Ntv News Marathi

• संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी करा
• पुरेसा धान्य व औषध साठा ठेवा
• सर्व विभागांनी समन्वय ठेवावा
• एसओपी अद्ययावत करा
• नियंत्रण कक्ष स्थापन करा

गोंदिया:- पावसाळा सुरू होण्यास खूप कमी कालावधी बाकी असून यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे आवश्यक असून जिल्ह्यातील पुरप्रवण गावांचा सूक्ष्म आराखडा तयार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी यंत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

     गोंदिया जिल्ह्यात ९६ गावे पुरप्रवण असून या गावात विशेष उपाययोजना असलेला आराखडा तयार करावा. या गावांसाठी पर्यायी मार्गांची यादी तयार करावी. त्याचप्रमाणे पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी तात्काळ सादर करावी. मान्सून तसेच आपत्तीच्या वेळेस कार्य प्रणालीची कार्यपद्धती अद्ययावत करावी, असे त्यांनी सांगितले. १ जून पासून तालुकानिहाय नियंत्रण कक्ष स्थापन करून नियंत्रण कक्षात पूर्ण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. त्याचप्रमाणे नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करण्यात यावी. अनुभवी पोहणाऱ्या व्यक्तींची यादी सुद्धा अद्ययावत करण्यात यावी. या यादीत महसूल व पोलीस विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा.

     धरणाचे पाणी सोडतांना गावकऱ्यांना पूर्व सूचना देण्यात यावी. त्यासाठी दवंडी, सोशल मिडिया आदीचा वापर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यक्षेत्रात सुरक्षीत निवारा, समाजभवन, शाळा, मंगल कार्यालय, लॉन, मोठ्या इमारती इत्यादींची ओळख करून त्या आरक्षीत करण्याबाबत कार्यवाही आताच करावी. विविध जलाशय, धरण, या ठिकाणी मान्सून कालावधीत सामान्य नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करणारा आदेश निर्गमीत करावा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
         नदी, नाल्यामधील गाळ काढणे, सफाई व स्वच्छता तातडीने करून घ्यावी. नदी, नाल्याच्या काठावर अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देण्यात यावी. आपल्या जिल्ह्यात वैनगंगा व बाघ या महत्वाच्या नद्या असून या ठिकाणी संदेशवहन यंत्रणा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नेमून दिलेली जबाबदारी प्रत्येक विभागाने पार पाडणे अनिवार्य असून मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी नियमीत संपर्क ठेवावा असे त्यांनी सांगितले. पूर ओसरल्यावर साथरोग वाढण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाने आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घ्यावी असे निर्देश दिले.
      पावसाळ्यात बस वाहून गेली, कार वाहून गेली, नागरिक पुरात अडकले व रेल्वे रुळावर पाणी साचले अशा घटना प्रत्येक वर्षी घडत असतात. हा जुना अनुभव लक्षात घेता या घटना घडणार नाहीत यासाठीच्या उपाययोजना आतापासूनच कराव्यात असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले. मागिल आपत्तीचा अनुभव व त्याचा अभ्यास करून उपाययोजना कराव्या असे ते म्हणाले. पूर परिस्थितीच्या डोंगा उलटून जिवित हानी झाल्याच्या घटना घडतात ही बाब लक्षात घेता पुराच्या काळात डोंग्याला प्रतिबंध घालण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
        सर्व यंत्रणांनी पूरपरिस्थिती व आपत्तीच्या काळात समन्वय ठेवून काम करावे तसेच दिलेल्या जबाबदारीचे गांभीर्याने पालन करावे असे निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी सांगितले. त्यांनी प्रत्येक विभागाला जबाबदारीचे वाटप करून दिले. प्रत्येक तालुका स्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. संपर्क तुटणाऱ्या गावांना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी भेटी देऊन नागरिकांना माहिती द्यावी असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *