अतिक्रमण हटवून रामवाडी परिसरात मूलभूत सुविधा पुरवा

विकास उडाणशिवे : मनपा उपायुक्त पटारे यांना निवेदन

अहमदनगर : सेंट झेवियर्स चर्च (तारकपूर) ते रामवाडी नवीन डीपी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या रस्त्यावरील रामवाडी प्रवेशद्वारा जवळ असणारी सार्वजनिक मुतारी आणि सार्वजनिक कूपनलिका या दोन्ही मूलभूत सुविधांचे रामवाडी येथील रहिवासी वापर करीत होते. मात्र सध्या डीपी रस्त्याचे काम सुरू असल्याने मुतारी व कूपनलिका (हातपंप) लगतच्या प्लॉटधारकाने मुतारी व कूपनलिका हटवली आणि त्या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रामवाडीतील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे . नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित झाले आहेत,तरी या जागेवर झालेले अतिक्रमण हटवून मुतारी व हातपंप सुविधा त्याचठिकाणी पूर्ववत सुरू करावयात अश्या आशयाचे निवेदन काच ,कागद,पत्रा वेचक संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे ,वाजिद शेख ,अलिम शेख,फय्याज शेख ,रफिक पठाण ,सलीम पठाण आदी कार्यकर्त्यांनी मनपा उपायुक्त पटारे यांना दिले.

रामवाडी भागातील लोकसंख्या भरपूर असल्याने आणि मूलभूत सुविधा हिरावली गेल्याने नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे . या मूलभूत गरजा अन्यत्र भागविताना दुर्गंधी,आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत . त्याचा परिणाम या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तरी या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. या मूलभूत सुविधा तात्काळ पुरवण्याबाबत कार्यवाही व्हावी. तसेच संबंधित प्लॉट धारकाला बांधकामाची परवानगी दिली असल्यास ती रद्द करून मुतारी ,हातपंप ,पथदिव्याची जागा सोडून परवानगी देण्यास रामवाडी परिसरातील नागरिकांची त्यास हरकत राहणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *