राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण येथे न्यायिक सदस्य
उमाकांत मिटकर.
गोष्ट छोटी डोंगराएवढी…
माझा धाराशिव जिल्हा माझा अभिमान
राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण येथे न्यायिक सदस्य
उमाकांत मिटकर.
एखाद्या जिल्ह्याला कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिळाला तर काय बदल घडवून आणू शकतो?, याचे उत्तम उदाहरण म्हणजे धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे होय. त्यांच्या कार्यकाळात धाराशिवची आकांक्षित जिल्हा ओळख पूसून जात आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम निर्देशांकात धाराशिवने देशात आठवा क्रमांक पटकावला आहे. ही गोष्ट निश्चितच अभिमानास्पद आहे. जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण,कृषी उद्योग, दळणवळण आदी क्षेत्रात डोंगराएवढे कार्य उभा राहिले आहे. धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीची ही कहाणी…
‘धाराशिव’ हे नाव उच्चारले की, डोळ्यांसमोर उभा राहतो इथला दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, सततची नापिकी यामुळे स्थलांतर होत असलेले लोक. यामुळे शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, दळणवळण या क्षेत्रामुळे धाराशिव जिल्ह्याचा विकास खुंटला गेला. हे सत्य असले तरी, महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत धाराशिव जिल्ह्याचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. हैदराबाद मुक्ती लढ्यात रझाकाराच्या जुलुमी अत्याचार विरोधात धाराशिवकरांनी हिंमतीने लढा दिला. जिल्ह्यात 1921 साली हिप्परगा (नरसोबाचे) येथे मराठवाड्यातील पहिली राष्ट्रीय शाळा उभी राहिली. थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून दायित्व सांभाळले. हा इतिहास आजही प्रेरणा देणारा आहे. तुळजापूरची आई तुळजाभवानी, नळदुर्गचा ‘खंडोबा’, येरमाळ्याची ‘येडाई’, वडगावचा ‘सिद्धेश्वर’,कुंथलगिरीचे ‘जैन मंदिर’ ही आमची शक्तीस्थाने आहेत. सावरगावचा ‘शिलालेख’ मराठी भाषेचा इतिहास सांगणारा आहे. धाराशिवची ‘शेळी’ आशिया खंडात प्रसिद्ध आहे. कुंथलगिरी-समरकुंडीचा ‘खवा’, धारशिवची ‘द्राक्षे’,ही आमच्या कृषी क्षेत्राची खरी संस्कृती आहे. एवढा दैदिप्यमान वारसा असताना धाराशिव मागे का? असा प्रश्न पडतो.
गेल्या तीन -चार दशकांपासून कमी पाऊसमान,सतत पडणाऱ्या दुष्काळाने आणि जागतिकीकरणामुळे इथला शेतकरी, नागरिक हैराण झाला आणि जिल्ह्याचे वैभव लयाला गेले आणि इथला ‘मागासलेपणा’ देशाच्या नकाशावर आला. जिल्ह्याचे हरवलेले वैभव परत आणण्यात ‘अस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोगाम’ अर्थात ‘आकांक्षित जिल्हा कार्यक्रम’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018-19 साली देशात आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यामध्ये महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील एक जिल्हा म्हणजे धाराशिव.
गेल्या चार- पाच वर्षांत आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामुळे धाराशिवच्या लोक जीवनात ‘क्वालिटी ऑफ लाईफ’ अर्थात जीवन जगण्याच्या दर्जामध्ये मोठा बदल घडवून आणलेला आहे. ‘इज ऑफ गव्हर्नन्स’ अर्थात सुशासन स्तरावर लवचिकता आणून त्यामध्ये सर्वांगीण बदल घडून येत आहे. यासाठी श्री.राधाकृष्ण गमे, श्री.कौस्तुभ दिवेगांवकर आणि डॉ.सचिन ओंबासे सारखे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी धाराशिवला लाभले. यामुळेच धाराशिव जिल्ह्यात विकासाचा महामार्ग तयार होत आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांचा डिस्ट्रिक्ट लेवल अर्थात जिल्हास्तरीय अनुभव वाखानण्याजोगा आहे. त्यांच्या सुप्रशासनामुळे धाराशिवच्या विकासाच्या मॉडेलची चर्चा होत आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाने धाराशिवच्या यशाचा झेंडा फडकवला आहे.
परवा गोव्याचे लोकायुक्त,न्यायमुर्ती श्री.अंबादास जोशी यांच्यासोबत डॉ.ओंबासे यांच्याशी भेट झाली.गप्पा मारताना त्यांचा आत्मविश्वास खूप पटीने वाढलेला दिसून आला. धाराशिव जिल्ह्याचा निर्देशांक 2018-19 साली 50 ते 80 च्या आसपास होता. तो आता आठव्या क्रमांकांवर आला आहे, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. ही जिल्हावासियांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा बदल कसा झाला आहे? याविषयी बारकाईने त्यांच्याशी बोलू लागलो. सर्व विषयाचे आकलन, घटक, क्षेत्र समजून घेत होतो. तेव्हा लक्षात आले, आपल्या धाराशिव जिल्ह्याने डोंगराएवढे कार्य उभे केले आहे. आपला जिल्हा, आपला गाव, आपला तालुका, सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक विकासाकडे दमदारपणे पावले टाकत आहे.
जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, कृषी, उद्योग, पाणी, पर्यावरण आदी सर्वच घटकात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य क्षेत्रात धाराशिव जिल्ह्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणात धाराशिव जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी म्हणून नीति आयोगाकडून प्रशंसा करण्यात आली आहे. देशात धाराशिवचे आरोग्य अकराव्या स्थानावर आहे. माता व बाल आरोग्य, पोषण, प्रजनन स्वास्थ्य या प्रमुख निर्देशांकांमध्ये जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे. सीएसआर अंतर्गत असलेला निधी शासकीय रूग्णालयास वापरला जात आहे. त्यामुळे रूण्ग्णालयात अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
याशिवाय कृषी व जलस्त्रोत क्षेत्रात तिसरे स्थान, व तसेच शिक्षण क्षेत्रात आठवे स्थान मिळविले आहे. कृषी हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा पाया आहे. जिल्ह्यात शेतरस्ते हा मोठा तंट्याचा विषय झाला होता, यामुळे सातत्याने वाद,कोर्ट केसेस होत होत्या. ही अडचण ओळखून प्रशासनाने अवघ्या सहा महिन्यात 555 शेतरस्ते खुले केले. यामुळे 5 हजार 408 शेतकऱ्यांना लाभ झाला. जिल्ह्यातील सूक्ष्म जलसिंचनामध्ये मागील काही वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कृषी सिचंन 4.68 टक्क्यावरून ते 20 टक्क्यापर्यंत वाढले आहे. यामुळे नगदी पिकांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धाराशिवच्या द्राक्षांना बाजारपेठेत मागणी वाढत आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक शेतीबरोबरच स्ट्रॅाबेरी, सफरचंद, खजूर, ड्रॅग्रन फ्रूट सारख्या फळपिकांची लागवड करताना दिसत आहेत. उत्पादन ते ग्राहक अशी मूल्यसाखळी विकसित व्हावी यासाठी जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या उभारण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. रेशीम शेती ही शाश्वत उत्पन्न देणारी शेती आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक हजार हेक्टर क्षेत्रावर रेशीम शेती केली जाणार आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. नुकताच जिल्ह्यातील समरकुंडी येथील खव्यास भौगोलिक मानांकन मिळाले आहे. एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत खवा उद्योग उभा राहण्यासाठी डॉ.ओंबासे प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दहन व दफनभूमी अभावी मृतदेहांची हेळसांड होण्याचे प्रकार होत होते. यामुळे जीवनाच्या अखेरचा प्रवास ही खडतर बनला होता. मात्र आता प्रशासनाच्या पुढाकारातून हा प्रवास सुखकर बनला असून तब्बल 116 दहन व 46 दफनभूमीसाठी खाजगी जागा उपलब्ध करण्यात आली आहे.यासाठी 27.20 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे
नागरीकांना मूलभूत सुविधा देण्यास जिल्हा प्रशासन तत्पर झाले आहे. ‘Samadhan Mobile App’ (समाधान मोबाईल अॅप) च्या माध्यमातून नागरीकांना आपल्या समस्या घरबसल्या मांडण्याची प्रणाली विकसित केली गेली आहे. या माध्यमातून नागरीक आपल्या समस्या ऑनलाईनच्या माध्यमातून नोंदवू शकतो. पंधरा दिवसांच्या आत समस्यांचा निपटारा केला जात आहे. याखेरीज जिल्ह्यातील शैक्षणिक असमतोलाचाही सूक्ष्मपणे अभ्यास केला आहे. येत्या काळात जिल्ह्यात 87 आदर्श शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणांची अमंलबजावणी, सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अंधारात चाचपडत असलेला धाराशिव जिल्हा आता विकासाच्या वाटेवर आहे. या पवित्र कार्यामध्ये डॉ.सचिन ओंबासे सारखा प्रामाणिक, निस्वार्थी जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यमग्न आहेतच पण याचे श्रेय ते नेहमीच त्यांच्या टिमला व सकारात्मक पद्धतीने जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या जिल्हावासियांना देतात…
- (उमाकांत मिटकर-94214 80874)
लेखक राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण येथे न्यायिक सदस्य आहेत.
***